अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गट. नं. ४४५ व ४४६ मधून जाणारा पूर्वापार वहीवाटीचा पानंद रस्ता व आठवडे बाजाराच्या जागेत गावातील एका बड्या राजकीय नेत्याने अतिक्रमण केले आहे.
विशेष म्हणजे राजकीय नेता व त्याच्या घरातील ग्रामपंचायत सदस्य यांनीच या जागेवर अतिक्रमण केले आहे. या नेत्याचे वरपर्यंत हात असल्याने ग्रामपंचायतने वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा रस्ता व बाजाराची जागा खुली होत नसल्याने उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सोमवार दि.१८ रोजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की गावातील एका राजकीय नेत्याने व त्याच्याच कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने गट. नं. ४४५ व ४४६ येथून गावठाणाकडे जाणारा पानंद रस्ता व आठवडे बाजारासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे.
ही अतिक्रमित जागा खुली करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाकडे रीतसर फी भरून मोजणी केली व हद्द खुणा दाखविण्यासाठी पोलीस संरक्षणही मागविले होते.
मात्र अतिक्रमण केलेला राजकीय नेता अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने मोजणी होऊनही भूमिअभिलेख कार्यालय हद्द खुणा निश्चित करत नाही. व मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करूनही दाखला देत नाहीत.
गावापेक्षा राव मोठा ठरत असल्याने ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ सोमवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत.
निवेदनावर उपसरपंच दीपक गाडे, अंबादास मांडे, गेना मांडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे यांच्या सह्या आहेत.
अतिक्रमण केलेला नेता हा सहकारी कारखान्याचा संचालक आहे. या कारखान्याच्या चेअरमनने काही दिवसांपूर्वी तहसीलदार यांना श्रीगोंदा येथील आपल्या खाजगी शिक्षण संस्थेत बोलावून या अतिक्रमण केलेल्या नेत्याला सहकार्य करण्याची तंबी दिल्याची चर्चा सुरू आहे.
कारखान्याचे चेअरमन महसूलमंत्र्यांच्या जवळचे समजले जातात त्यामुळे या संचालकाच्या दबावात महसूल विभाग व भुमीअभिलेख कार्यालाचे अधिकारी व कर्मचारी काम करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम