Ahmednagar News : कांदा निर्यातबंदी उठली व भाव अवधातील या अपेक्षेने अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली. मंगळवारी कांदा लिलाव बोलीतून हजार-बाराशेने सुरुवात होताच संतप्त कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत अकोले देवठाण रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.
हजार रुपयांपर्यंत कमी भाव मिळाल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी आगपाखड केली. संगमनेर राहुरी येथे चौदाशे ते पंधराशे भाव मग अकोलेत कमी का, असा सवाल करत लगेच बाजार समिती प्रशासनाचा व्यापाऱ्यांवर वचक नाही, व्यापाऱ्यांकडून लूट केली जाते, असे आरोप सुरू झाले.
हा गोंधळ सुरू असताना संगमनेर येथून कांदा लिलाव संपून व्यापारी अकोलेत आले, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांची चर्चा झाली. जिल्ह्यात जो बाजार सुरू आहे त्याच पद्धतीने येथे कांदा खरेदी केला जात असल्याचे व्यापाऱ्यांकडून समजून सांगण्यात आले.
त्यानंतर कांदा लिलाव सुरू झाले. कांद्याला दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.
संगमेनरमध्ये लिलाव बंद पाडले
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.७) मे रोजी कांद्याचे बाजारभाव पाडल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.
मात्र कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व सचिव यांच्यात बैठक झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होऊन आठशे ते सोळाशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढले आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असून बाजारभावही चांगले मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी वडगावपानसह इतर गावांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जवळपास दोनशे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वडगावपान उपबाजार समितीत कांदे विक्रीसाठी आणले होते. मात्र दोन हजार रूपयांवर गेलेले कांद्याचे बाजारभाव भाव थेट व्यापाऱ्यांनी पंधराशे रूपयांवर आणले होते.
हा बाजारभाव मान्य नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट कांद्याचे लिलाव बंद पाडले आणि जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला.