Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली असून राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांना अटक करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील ही पतसंस्था आहे.
रविवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजता राहत्या घरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयात सोमवारी त्यांना हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती समजली आहे. या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरार झाल्याची माहिती समजली आहे.
पारनेरचे सहायक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी तक्रार व चौकशी अहवालानुसार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी पारनेर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. त्यानुसार पारनेर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी
रणजित गणेश पाचर्णे (रा. पाचर्णेमळा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे), पोपट बोल्हाजी ढवळे (प्रोपा. सागर असोसिएट, रा. हंगा, ता. पारनेर), आझाद बाबासाहेब ठुबे (अध्यक्ष, राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, रा. कान्हूर पठार, ता. पारनेर), संभाजी भालेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी,
राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था), अशा चारजणांवर गुन्हा दाखल केला होता. २०१९ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी असलेले शिवाजी रिकामे व इतर ११ जणांनी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती.
त्या अनुषंगाने सहायक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब भोसले, आर. व्ही. वाघमोडे व मुख्य लिपिक आर. एस. चाबुकस्वार यांच्या पथकाने १ डिसेंबर २०२३ रोजी अहवाल सादर केला होता.
त्यानुसार पारनेरचे सहायक निबंधक गणेश औटी यांनी खासगी सावकार रणजित पाचर्णे व राजे शिवाजी पतसंस्था यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खबर दाखल केली.
राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात…
फसवणूक प्रकरणात आझाद ठुबे यांना रविवारी रात्री अटक केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हातावर उचल घेतली आहे. ही देणी थकविल्याने ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या तक्रारीनुसार ठेवी मिळत नसल्याने राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.