Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगमध्ये करोडोंची फसवणूक, गुंतवणूकदार आक्रमक, लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून गुन्हे दाखल न केल्यास मतदानावर बहिष्कार

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची करोडोंची संपत्ती घेऊन फरार होण्याच्या घटना उघडकीस आल्या. शेवगाव तालुक्यामधील सर्वाधिक प्रकार यात उजेडात आले.

तालुक्यातील जवळपास आठ ते दहा व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पलायन केले असल्याचे समजते. मात्र याप्रकरणात गुन्हे दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका घेत लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून गुन्हे दाखल न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना भुरळ घातली. अमिषाला बळी पडून अनेकांनी कर्ज काढून, कुणी सोने-नाणे गहाण ठेवून, तर कुणी शेतीमाल विकून लाखो रुपयांची डोळे झाकून गुंतवणूक केली. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील आठ ते दहा शेअर टेडिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी एका पाठोपाठ एक पलायन केले आहे.

दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड यांनी गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी चापडगाव येथे गुरुवारी (दि.१८) चापडगाव व परिसरातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक घेतली. आयुष्यभरची पुंजी गमावल्याचे दुःख मांडताना अनेकांचे बोलताना काहींचे डोळे डबडबले होते.

लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दोनशे-तीनशे गुंतवणूकदार, ग्रामस्थ उपस्थित होते.

तक्रार देण्यास अद्यापही कुणी येईना, तपास कसा करायचा ?
शेअर ट्रेडिंग करणारे पैसे घेवून पळून गेले असले तरी अद्याप शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास कोणी पुढे आलेले नाही. त्यामुळे संबंधितांविरोधात तक्रार देण्यासाठी कोण पुढे येणार असा प्रश्न असून तपास कसा करायचा हे देखील आवाहनच आहे.

गुंतवणूकदार एकत्र येवून तक्रार देणार, सीबीआय चौकशीची मागणी करणार
गुंतवणूकदार एकत्र येवून पुन्हा शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe