Ahmednagar News : गौतम अदानी हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. देशभरातील विविध मोठ्या प्रकल्पांत त्यांची भागीदारी आहे. विमानतळे, वीजनिर्मिती क्षेत्रात त्यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचे सर्वश्रुत आहे. आता अदानी यांनी थेट शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यानंतर स्वतः माजी खा. सुजय विखे यांनी त्यांच्या वाहनाचे सारथ्य करत स्वतःच्या घरीही नेले. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे अदानींचा डोक्यात आहे तरी काय? तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊयात..
सौर ऊर्जा प्रकल्प
साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अदानी यांच्या भेटीनंतर एका मीडियाशी बोलताना सांगितले की, साईसंस्थान सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ इच्छीते.
त्यात अदानी यांनी सहभाग घेतल्यास हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर राबवून संपूर्ण परिसर ऊर्जा वापरात स्वयंपूर्ण करता येईल का? याबाबत विचारविनिमय करता येईल.
त्यादृष्टीने ही भेट आम्हाला महत्त्वाची वाटते. त्यामुळे आता गाडीलकर यांच्या भेटीनंतर अदानी हे शिर्डीच्या सौर ऊर्जा प्रकल्पसाठी डोके लावतील का? असा सवाल नागरिकांना पडलाय.
साई मंदिरात प्रार्थना
सहा वाजण्याच्या सुमारास खासगी विमानाने अदानी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्याच वाहनात बसून विमानतळ ते साई मंदिर प्रवास केला.
मोटारीचे सारथ्य विखे पाटील यांनी केले. साईमंदिरात सपत्नीक दर्शन घेतले. पाद्यपूजा व छोटी आरती केली. शुभ्र पांढऱ्या रंगाची चादर चढवली.
संस्थानच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती घेतली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संगमरवरी साई मूर्ती भेट देऊन स्वागत केले.
विखे पाटील यांच्या निवासस्थानी देखील चर्चा
दर्शन आटोपल्यानंतर अदानी दाम्पत्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी गेले. अदानी दाम्पत्य रात्री नऊच्या सुमारास शिर्डी विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.