Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शेवगाव तालुक्यात या फसवणुकीचे फार मोठे प्रमाण आहे. काही दुकान थाटून बसलेले अक्षरशः पळून गेले आहेत.
आता याच तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोन आरोपित एक हभप महाराज असल्याची माहिती समजली आहे.
हरिभाऊ गणपत अकोलकर, महेश दत्तात्रय हरवणे (दोघे रा. भायगाव, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपींनी भायगाव (ता. शेवगाव) येथील राजेंद्र रामराव आढाव व इतरांची शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित ६५ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
शेअर मार्केटच्या नावाखाली शेवगाव तालुक्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे चौकशी केली.
मात्र, दोघे आरोपी गावात मिळून आले नाहीत. आरोपींचा शोध घेत असताना ते मित्रासोबत उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार तांत्रिक विश्लेषणात आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी मथुरा येथे जाऊन सापळा रचला. त्यात वरील दोघे आरोपी अलगद अडकले.
आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अमृत आढाव, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने केली.