Ahmednagar News : शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (दि. २४) सकाळपासून पावसाची रिमझिम आणि काही भागात संततधार सुरू आहे. भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, म्हणजे अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
भंडारदरा १५ ऑगस्टपूर्वीच भरेल अशी स्थिती आहे. दक्षिणेतही पावसाचे धुमशान सुरु आहे. जामखेड तालुक्यात खर्डा परिसरातील मोहरी, नायगाव लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले आहेत.
मागील आठवड्यात अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे मोहरी तलाव एका रात्रीत ओव्हरफ्लो झाला. सांडव्याहून पाणी ओसंडून वाहू लागले.
तसेच नायगाव तलावही शंभर टक्के भरल्याने नायगाव व मोहरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र तालुक्याच्या इतर भागात अत्यल्प पाऊस आहे.
तलावातील पाणीसाठा..
मोहरी १.५२ दशलक्ष घनमीटर (१०० टक्के), नायगाव १.८९ दशलक्ष घनमीटर (१०० टक्के), पिंपळगाव आळवा लघु पाटबंधारे ०.८४ दशलक्ष घनमीटर (२९.६५ टक्के),
तेलंगशी ०.०१ दशलक्ष घनमीटर (१.८९ टक्के), अमृतलिंग ०.१५ दशलक्ष घनमीटर (११.९० टक्के), जवळके ल. पा. तलाव निरंक, तर खैरी ५.४२५ दशलक्ष घनमीटर (२९.५२ टक्के).
पाथर्डीमधेही हजेरी
परिसरात बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. पहाटेपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांचे हाल झाले.
राहुरी, पारनेरमध्येही संततधार
परिसरात सकाळ पासूनच हलक्या सरींचा वर्षाव सुरू होता. हलक्या सरी कोसळत असल्याने सर्वत्र ओलावा निर्माण झाला. कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाच्या रिमझिम सरींनी वातावरणात गारवा पसरला होता.
पारनेर तालुक्यात दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण व हवेत गारवा होता. संततधार पावसामुळे शाळकरी मुले, चाकरमान्यांचे हाल झाले.