Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून उपडीप दिलेल्या पावसाने रविवारी (दि.११) संध्याकाळ पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी देखील सर्वच भागात जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे.
श्रीगोंदा, संगमनेर, राहुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोळगाव-मोहरवाडी सत्यावरील पूल वाहून गेला असून, मखरेवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, रविवारी रात्रभर श्रीगोंदा मंडळात सर्वाधिक ९९.३. तर कोळगाव मंडळात ८०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, याशिवाय मांडवगण व काही मंडळांतही अतिवष्टी होऊन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
श्रीगोंदा तालुक्यात ५८८ मिलिमीटर म्हणजे २४१ टक्के इतक्या पावसाची आतापर्यंत नोंद आहे. श्रीगोंदा मंडल ५१८ मिलिमीटर, कोळगाव ६१६, देवदैठण ५१३, चिंभळे ४८१, पेडगाव ४९८, बेलवंडी ४६२, मांडवगण ४७४, काष्टी येथे ४८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, मूग, कांदा, सोयाबीन, बाजरी, उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले.
कोळगाव मंडलात पाऊस झाल्याने ओल्या दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात रविवारी (दि. १८) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी ओढे-नाले वाहू लागले, पाझर तलावांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
डोळासणे येथे ४५ मिमी. तर घारगाव येथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कडक ऊन पडत होते. पावसाने दडी मारल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.
फुलोऱ्यात आलेल्या बाजरी, सोयाबीन आदी खरिपाची पिके सुकू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत होते, रविवारी सायंकाळी पठार भागातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
भिंत पडली
आंबी खालसा परिसरात आलेल्या पावसाने रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गणपीरदरा येथील आरिफ गणीभाई शेख यांच्या घराची भिंत पडली. ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. घारगाव व माहुली परिसरात बाजरी व मका पिके भुईसपाट झाली.
पिकांचे नुकसान
श्रीगोंदेत अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, उडीद, कांदा पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, सरकार तुमच्या पाठीशी आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही फोनद्वारे संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी म्हटलंय.