Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (दि. २४) सकाळपासून पावसाची रिमझिम आणि काही भागात संततधार सुरू आहे. भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, म्हणजे अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दोन्ही धरणांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रास पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

जिकडे तिकडे केवळ पाणीच पाणी दिसत असून, हवेत गारठा निर्माण झाला आहे. भंडारदरा धरणात बुधवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या चोवीस तासात ८०३, तर बुधवारी दिवसभरात ६०४ असे ३६ तासात सुमारे दीड हजार म्हणजेच १ हजार ४०७ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली
आणि ११ हजार ३९ दलघफू क्षमता असलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या जवळपास ७० टक्यांपर्यंत (६८.७७) म्हणजेच ७ हजार ५९० दलघफू झाला होता. पाऊस असाच कोसळला तर पुढील चार दिवसात भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होऊ शकते.
मुळा खोऱ्यामध्ये हरिश्चंद्रगड, पाचनई या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने मुळा नदीचा विसर्ग वाढला आहे. या दरम्यान आढळा धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील परिस्थिती अशीच कायम राहिल्यास हे धरण येत्या १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
ओढ्या नाल्यांना नदीचे रूप
हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांतही पावसाने हाहाकार माजविला आहे. या परिसरातील ओढ्या नाल्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे रूप आले आहे. त्यामुळे मुळा नदीला मोठा पूर आला आहे. या पावसाळ्यात प्रथमच लहितजवळील मुळा नदीचा विसर्ग २५ हजार ८२८ क्यूसेक इतका होता.
बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नोंदला गेलेला पाऊस (मिमी) – रतनवाडी २८५, घाटघर २७०, पांजरे २५५ तर भंडारदरा १६० मिमी