Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात असलेल्या चिमटा वस्ती, लांडगे वस्तीनजीक असलेल्या निलेश बाजीराव कडनोर यांच्या मेंढ्याच्या कळपावरती तीन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार झाल्या आहेत.
ही घटना बुधवारी (दि. २९) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे कडनोर यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी मध्यरात्री घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात आवाज येऊ लागल्याने निलेश कडनोर व त्यांच्या घरच्यांनी तीन बिबटे मेंढ्याच्या कळपात शिरताना बघितले.
बिबट्यांनी हल्ला चढवीत मेंढ्यांना समोरच्या शेतात ओढुन नेत त्यांचा फडशा पाडला. कडनोर कुटुंबिय बिबट्याच्या धास्तीने घराबाहेर आले नाही, ठार केलेल्या काही मेंढ्या सकाळी मृतअवस्थेत आढळुन आल्या.
घटनेबाबत वनविभागाला कळविले असता, त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. रांजणखोल परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे.
परिसरात शेळ्या मेंढ्या कुत्री वासरे हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लोक वस्तीमध्ये बिबट्याच्या बिनधास्त वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अशातच गोठ्यामध्ये शिरून पाळीव जणावरांवर बिबट्याकडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा,
अशी मागणी चिमटा वस्ती, ठोंबरे वस्ती, दोंड वस्ती, लांडगे वस्ती, गिरमे वस्ती, पवार वस्ती, अभंग वस्ती, ढोकचौळे वस्ती व ग्रामस्थांकडून केली जात आहे.