Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता प्रशासन सरसावले असून ज्या महिला या योजनेस पात्र आहेत त्या महिलांना कोणत्याही अडथळ्याविना अर्ज भरता यावा यासाठी दोन दिवसाची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात महिला बालकल्याण विभागाने ‘मायक्रो प्लॅन’ तयार केला यात असून महिलांचे ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी गावोगावी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
ही मोहीम १२ व १३ जुलै असे दोन दिवस आयोजित होणार असून ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. ग्रामपंचायत, वाडी-वस्ती आणि वॉर्डस्तरावर योजनेचा प्रचार केला जाईल.
त्यासाठी ग्रामपंचायत, वाडी, वस्ती, वार्ड स्तरावर शिबिरे घेतली जाणार आहेत. महिलांचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज भरून घेण्यात येतील. त्यासाठी १२ व १३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत प्रत्येक ग्रामस्तर व शहरी भागात विशेष मोहीम राबविण्यात येईल.
मोठ्या ग्रामपंचायती, वार्ड यांमधील लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन जास्त गर्दी होऊ नये म्हणून अशा ठिकाणी अधिक शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, विहीत नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरून घेऊन
ते ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर अपलोड केले जाणार आहेत. तसेच दोन दिवसीय शिबिरावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे जिल्ह्यातील बहुतांश शिबिर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतील.
आतापर्यंत ८३ हजार अर्ज
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्यात ८३ हजार ४८९ महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. यातून ३६ हजार ३९२ अर्ज ऑनलाइन भरण्यात आले आहेत. उर्वरित अर्जही ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया अंगणवाडीसेविका करत आहेत.