Ahmednagar News : बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात वाढ होत आहे. काल नगर जिल्ह्यातील विविध बाजार समिती आवारात झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ४००० ते ४३११ रुपयांचा दर मिळाला.
अनेक महिन्यांनंतर कांद्याच्या दरात तेजी आल्याने कांदा उत्पादक सुखावला आहे. कोल्हापूर आणि सोलापुरात एक नंबरच्या कांद्याला राज्यात सर्वाधिक ४५०० रुपयांचा किंटलमागे दर मिळाला.
तर नगर जिल्ह्यात सर्वाधिक भाव संगमनेर बाजार समितीत मिळाला. येथे कांदा २००० ते ४३११ रुपयांनी विकला गेला.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये भाव मिळाला. आवारात मागील आठवड्याच्या तुलनेने आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. बुधवारी बाजार समितीत एकूण ३६ हजार ५८२ कांदा गोण्यांची आवक झाली होती.
यावर्षी कांदा उत्पादनात घट झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत कांदा खराब होऊ लागल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जागेवरच कांदा विकला आहे.
त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. बुधवारी लिलावात दोन लॉट प्रतिक्विंटल ४ हजार २०० त्यानंतर मोठा कांदा ३८०० ते ४०००, मुक्कल भारी ३७०० ते ३९०० गोल्टी ३८०० ते ४०००, जोड कांदा १५०० ते ३००० रुपये, असा भाव मिळाल्याचे समजते.
श्रीरामपूर बाजार समितीत दर मिळाला. येथे झालेल्या कांदा लिलावात १० हजार ३७८ गोण्यांची आवक झाली. त्यातील सुरुवातीच्या ५०० गोण्यांना ४२०५ रुपये भाव मिळाला तर अन्य गावरान कांद्याच्या गोण्यांना ४००० रुपये, लूज कांद्याला ३८२५ रुपये इतका भाव मिळाला.