Ahmednagar News : कडक उन्हाळ्यामुळे रुग्ण वाढले ! ताप, सर्दी, खोकला आजारांनी नागरिक त्रस्त, पिकांवरही परिणाम

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या तापमानात गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्शियसवर पोहोचल्याने प्रचंड उकाड्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

कडक उन्हाचा शेतपिके व फळबागांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हवेत आल्हादायक गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकही सुखावले होते, मात्र मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, अचानक उष्णता वाढली आहे.

शनिवारी (२६ एप्रिल) दुपारी अनेक ठिकाणचे तापमान ४० अंशांवर गेले होते. त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कडक उन्हामुळे आंबा बागायतदारही हवालदिल झाले आहेत.

आरोग्यावर विपरीत परिणाम !
दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवते. दिवसभर नागरिक घामांच्या धारांमध्ये भिजून निघत आहेत. उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण झाले असून, आरोग्यावरही या उन्हाचा परिणाम होत आहे.

त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी ग्रासले असून, सरकारी व खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. नागरिक तापमानातील बदलामुळे, तसेच अधुनमधून हवामानात बदल होत असल्याने सर्दी, ताप, खोकल्यांवरील उपचारासाठी दवाखान्याचे हेलपाटे मारत आहेत.

सतत पाणी पित राहा
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नागरिकांना थकवा जाणवतो, तर काहींना उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे. शारीरिक थकव्यामुळे पायाला गोळे येत आहेत. जेवण कमी होते.

काहीही खावेसे वाटत नाही. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा. दुपारचा प्रवास टाळावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ञ करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News