Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव येथील युवकाच्या विरोधात २ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या युवकाने शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली प्रतिमहिना १२ टक्के प्रमाणे परतावा देतो, असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (दि.२५) शेवगाव पोलिस ठाण्यात सोपान माधव काळे (वय ३८, रा. कुरुडगाव, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर रावसाहेब शिंदे (रा. कुरुडगाव, ता. शेवगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात दिलेल्या फिर्यादित म्हटले की, आरोपी शिंदे याने ‘एसआर इन्वेस्टर’ नावाने गावात शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरू केले होते. फिर्यादी काळे हे त्याच्या कार्यालयात गेले असता, त्याने प्रतिमहिना १२ टक्क्यांप्रमाणे परतावा देण्याचे आमिष दाखवले.
त्यावर विश्वास ठेवून काळे यांनी वेळोवेळी ६९ लाख ४० हजार रुपये शिंदे याच्याकडे दिले. त्या बदल्यात शिंदे याने त्यांना पावतीही दिली. दरम्यान परतावा मागण्यासाठी काळे गेले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर तो कार्यालय, घराला कुलूप लावून पळून गेल्याचे समोर आल्यावर फसवणूक झाल्याचे काळे
यांच्या लक्षात आले. काळे यांच्याशिवाय गावातील, तसेच परिसरातील कैलास सुभाष राऊत ६० लाख, ताजुभाई कडुभाई शेख १ लाख ४० हजार, दत्तात्रय त्रिंबक औटी ११ लाख ५० हजार, सचिन राजू शिंदे ५ लाख, बबन अण्णासाहेब शिरसाट २८ लाख ५० हजार,
जालिंदर रावसाहेब जाधव ३ लाख, अवधूत विनायक केदार २ लाख ५० हजार, संजय नारायण कोकासे ४ लाख ५० हजार, महेश दानियल घाडगे ७० हजार, उषाबाई तुकाराम खरात २ लाख, कृष्णा रावसाहेब घनवट ३ लाख, नितीन बाळू तिजोरे २ लाख ४० हजार,
विनोद दिनकर घाडगे ५ लाख, अशोक केशव कापरे १० लाख, अशी या सर्वांची २ कोटी ८९ लाखांची त्याने फसवणूक केली आहे.