Ahmednagar News : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाला काल मंगळवारी (दि.२७) उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर बाजार समितीमध्ये एक नंबर डाळिंबाला प्रति किलो २५१ ते ३५० रुपयापर्यंत पर्यंत भाव मिळाला आहे. तसेच दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो भाव मिळाला. तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला.
तसेच येथील संगमनेर बाजार समितीत ५२८१ गोणी कांद्याची आवक झाली होती. सुरुवातीच्या सुपर मालाला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. तसेच १ नंबर कांद्यास ३९०० ते चार हजार रुपये, २ नंबर कांद्यास साडेतीन हजार ते ३८५१ रुपये तर ३ नंबर कांद्यास २९५१ ते ३४५१ रुपये भाव मिळाला.
संगमनेर बाजार समितीच्या वडगाव पान येथील उपबाजारामध्ये लुज कांदा मार्केट सुरु केलेले असून सदर ठिकाणी देखील लुज कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने वजन काट्याची व्यवस्था केलेली असून जाहीर लिलावाद्वारे लूज कांदा विक्री केली जात असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आपला लुज कांदा हा योग्य प्रतवारी करुन उपबाजार वडगावपान येथे तसेच गोणी मधील कांदा तसेच डाळींब, टोमॅटो हा शेतमाल देखील योग्य प्रतवारी करुन बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात विक्रीसाठी घेवून यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.