Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या धक्कादायक घडामोडी समोर आलेल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून एका आरोपीने धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून बेलबंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात ब्रिटिशकालीन विसापूर खुले कारागृह आहे. या कारागृहात अनेक कैदी (बंदी) न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत असतात ५ मे रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास

खुले कारागृह विसापूर येथील सजा भोगत असलेला आरोपी बंदी क्रमांक ४०७ अमित उर्फ राजू राजपूत (वय २९ वर्षे, रा. कावळे वस्ती, डोंगरगाव, ता. मावळ, जि.पुणे हा बंदी बाथरूमला जातो असे सांगून कारागृहाच्या कायदेशीर रखवालेतून पळून गेला आहे.
कारागृह प्रशासनाला सदरची माहिती मिळताच त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शोधाशोध करूनही आरोपी मिळून येत नसल्यामुळे कारागृह कर्मचारी नंदकुमार शिंदे (नेमणूक खुले कारागृह, विसापूर, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून अमित उर्फ राजू राजपूत याच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात भादंवि क २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीकडून पत्नीला व मेव्हण्याला मारहाण
तर दुसऱ्या घटनेत वकिलामार्फत नोटीस पाठविल्याच्या रागातून पतीने पत्नीला व मेव्हण्याला मारहाण केल्याची घटना नवनागापूरच्या मल्हारनगरमध्ये घडली. याप्रकरणी पत्नी शितल संदीप पवार (रा. नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
पती संदीप शंकर पवार (रा. नवनागापूर) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० एप्रिल रोजी फिर्यादी त्यांच्या माहेरी असताना संदीप तेथे आला. ‘तू वकिलामार्फत नोटीस पाठविली काय’ असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली.
फिर्यादीचा भाऊ सागर (पूर्ण नाव नाही) सोडविण्यासाठीमध्ये आला असता त्याला कुऱ्हाड व काठीने मारहाण करून जखमी केले. जखमी सागर यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.