साथीच्या आजारांचा फैलाव ! तपासण्यांच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणूक

Ahmednagar News : वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांचा अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. साथीच्या आजारांमुळे लहान मुलांसह अनेक मोठी माणसे आजारी पडत असल्याचे चित्र आहे. शहरासह तालुक्यातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.

याचाच फायदा घेऊन ग्रामीण भागात खाजगी दवाखाने आणि लॅबचालक यांनी हातमिळवणी करत विविध तपासण्यांच्या नावाखाली रुग्णांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक प्रशासनाकडून साथ नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना ढगाळ वातारणामुळे साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार झाले आहे.

रुग्णांमध्ये अंगदुखी, तीव्र ताप, अंग खाजवणे अंगावर पुरुळ येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ होणे, अशी लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णांमध्ये डेंग्यू, चिकनगुनीया, गोचिडताप,टायफाईड यासारख्या आजारांची लक्षणे अधिक दिसत आहेत.

सध्या सण-उत्सवांचे दिवस आहेत. त्यातच वाढत्या आजारांमुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे. रोजच्या कामावर उपजीविका करणाऱ्या गोरगरिबांना महागडे उपचार घेणे शक्य नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

सामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक
खासगी रुग्णालयांवर तसेच लॅबचालक यांच्यावर शासनाचा कसलाही वचक नसल्याने सामान्य नागरिकांना लुटण्याचे काम सध्या सुरु आहे असे नागरिक तक्रार करत आहेत.

खाजगी रुग्णालय आणि लॅबचालक हातमिळवणी करत विविध तपासण्या करायला लावत सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe