Ahmednagar News : राहुरीकडून नगरकडे जात असलेल्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने पुढे असलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याची घटना राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरात नगर- मनमाड राज्य महामार्गावर दि. २० नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले.
याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की कचरू निवृत्ती कारखेले (वय ५७ वर्षे) हे पाथर्डी डेपोमध्ये बसचालक आहेत. दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी कारखेले हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी १०४८) घेऊन श्रीरामपूर येथून राहुरीमार्गे पाथर्डी येथे जात होते.
दरम्यान सकाळी ८.२० वाजेच्या सुमारास ते एसटी बस घेऊन जात असताना राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर त्या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि एसटी बसने पुढे असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली.
या घटनेत एसटी बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघात झाल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. स्थानिक लोकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवीले.
या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात बसचालक कारखेले यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राज्यात एसटी महामंडळाकडून मोडकळीस आलेल्या व कालबाह्य झालेल्या एसटी बसेस चालवल्या जातात. एसटी बसचा प्रवास हा सुरक्षीत व सुखकर समजून प्रवासी रोज एसटी बसमधून प्रवास करत आहेत;
मात्र कालबाह्य झालेल्या एसटी बसमधून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. एसटी महामंडळ हे प्रवाशांच्या जिवीताशी खेळत आहे. महामंडळाने कालबाह्य झालेल्या सर्व एसटी बसेस बंद करून नवीन बसेसचा वापर करावा, अशी मागणी अॅड. सुरज बिहाणी यांनी केली आहे.