एसटी प्रवाशांनी गच्च भरलेली, चालकाला भोवळ आली.. पट्ठ्याने त्यातही प्रसंगावधान राखलं अन ५७ प्रवासी वाचले

आपण अनेक दुर्घटना दररोज वाचतो, पाहतो. आता अहमदनगरमधून देखील एका दुर्घटनेचा थरार समोर आलाय. भर रस्त्यावर धावत्या बसमध्येच चालकाला अचानक भोवळ आली. त्यात जवळपास विद्यार्थ्यांसह ५७ प्रवासी होते.....

Ahmednagarlive24 office
Published:
bus

Ahmednagar News : आपण अनेक दुर्घटना दररोज वाचतो, पाहतो. आता अहमदनगरमधून देखील एका दुर्घटनेचा थरार समोर आलाय. भर रस्त्यावर धावत्या बसमध्येच चालकाला अचानक भोवळ आली.

त्यात जवळपास विद्यार्थ्यांसह ५७ प्रवासी होते. परंतु भोवळ आलेली असतानाही चालकाने प्रसंगावधान राखून कृती केली अन..मोठी दुर्घटना टळली. यात चालकांसह ९ जण किरकोळ जखमी झालेत.

अधिक माहिती अशी : बुधवारी (दि.२८) सकाळी साडेनऊच्या सुमारास अर्जुन गुठे हे शेवगाव आगाराची बस राणेगावहून शेवगावकडे घेऊन निघाले होते. बस गेवराई रस्त्यावर नित्यसेवा रुग्णालयाच्या परिसरात आली.

त्यावेळी चालकास भोवळ आली. तरीही त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर बस नेली. यात एसटी बसचे काही प्रमाणात नुकसान झाले. बसमध्ये ५७ प्रवासी होते. या घटनेत चालक अर्जुन गुठे जखमी झाले.

इतर नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे या बससमध्ये तीसहून अधिक पासधारक विद्यार्थी प्रवास करत होते. चालकाच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर बसचालकाला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य जखमी प्रवाशांना लगेच सोडण्यात आले. बसमधील ५७ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत बसस्थानक प्रमुख किरण शिंदे यांनी सर्व प्रवासी सुखरूप असून, चालकाला बस चालविताना भोवळ आल्याने अपघात घडल्याचे सांगितले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या प्रकाराचीच दिवसभर चर्चा तालुक्यात रंगली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe