Ahmednagar News : अलीकडील काळात शिक्षणाची व्याख्या, शिक्षण घेण्याची पद्धत, पालकांच्या अपेक्षा यात मोठा बदल झाला आहे. तसेच शाळाशाळांमध्ये स्पर्धा वाढल्यात व पालकही इंग्रजी माध्यमाकडे ओढा घेत आहे.
त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम पटसंख्येवर झाला असून जिल्हा परिषदेच्या १४२ प्राथमिक शाळांमधील पटसंख्या प्रचंड घसरली आहे.

त्यामुळे जवळपास १५८ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात प्राथमिक शिक्षक १४२, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक प्रत्येकी आठ जणांचा समावेश आहे.
२०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार मंजूर कार्यरत पदांची प्रवर्गनिहाय माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहे. त्याआधारे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. १६ ऑगस्ट तारीख निश्चित करण्यात आली आहे.
३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त केला जातो. त्यानुसार विद्यार्थी संख्या कमी झाली तर एक शिक्षक अतिरिक्त होतो. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा असून ११ हजार १५९ शिक्षकांची संख्या आहे.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेत ७५० शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षकांवर शाळा चालू होत्या. शासनाने शिक्षक भरती सुरू केल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नगर जिल्हा परिषदेत १११ शिक्षकांची नव्याने पदे भरण्यात आली होती.
त्यानंतर जुलै महिन्यात आंतरजिल्हा बदलीने १२८ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आल्याने ३३९ रिक्त जागा भरण्यात आल्या.
सन २०२३-२४च्या संचमान्यतेनुसार काही शाळांमध्ये पटसंख्या कमी झाल्याचे आढळून आल्याने आता त्या १४२ शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे आता समायोजन केले जाणार आहे.
पालकांकडून जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळांना प्राधान्य दिले जात आहे. अशा काही शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याने त्या शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र दुसरीकडे लहान शाळांमधील पटसंख्या कमी होतांना दिसत आहे.