Ahmednagar News : घरगुती गॅस गळती होऊन उडालेल्या भडक्यात नऊ जणांसह चार जनावरे जखमी झाले. ही घटना काल शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
यात जीवित हानी झाली नसली, तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली.
अधिक माहिती अशी, की एकरुखे गावातील गणेशनगर रोडवर गणेश कारखान्याशेजारी वायकर वस्ती आहे. येथील सुरेश भाऊसाहेब वायकर यांनी घरगुती वापरातील नवीन गॅस टाकी वापरासाठी आणली होती. टाकी घरात आणल्यानंतर त्यांनी टाकीचे सील उघडले.
यावेळी टाकीतून गॅस लिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी टाकी तात्काळ घराबाहेर आणली. त्यांनी गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले; परंतु घराबाहेर काही अंतरावर चुल पेटलेली होती. गॅस टाकीतून गॅस मोठ्या प्रमाणात गळती होऊन परिसरात पसरला.
काही क्षणातच आगीचा भडका उडाला. यात वायकर कुंटुबातील व शेजारील विप्रदास कुंटुबातील नऊ सदस्य यात होरपळले. सकाळची वेळ असल्याने सर्व सदस्य घराबाहेर आपापली कामे करत होती; परंतु काही समजण्याच्या आतच ती सर्व होरपळली. त्यांच्या बरोबरच घरासमोर गोठ्यात बांधलेल्या दोन गायी व दोन म्हशीही या आगीत भाजल्या.
या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर सुष्टी सुरेश वायकर, भाऊसाहेब गंगाधर वायकर, विनय नारायण वायकर, नारायण भाऊसाहेब वायकर तसेच यश किरण विप्रदास, पुजा किरण विप्रदास असे नऊ जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक जालिंदर गाढवे, सरपंच जितेंद्र गाढवे, माजी संचालक देवेंद्र भवर, सोपान कासार, विनोद गाढवे, अनिल गाढवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमींवर उपचार सुरू असून जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली व घटनेची माहिती घेतली. या घटनेत भाजलेल्या जनावरांवर उपचारासाठी राहाता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वेंदे, डॉ. नितीन निर्मळ, डॉ. उमेश पंडुरे यांनी प्रयत्न केले.
जखमी जनावरांपैकी एक म्हैस गाभण आहे व तीच मोठ्या प्रमाणात भाजली. घटनास्थळी एकरुखेच्या तलाठी ज्योती कव्हाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. वायकर यांच्या घरी नवनाथ पारायणाची सांगता होती. त्याचा स्वयंपाक बनविण्यासाठी सकाळीच नवीन गॅस टाकी आणण्यात आली होती.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस टाकी घराबाहेर आणण्याच्या घाईत घसरून पडल्याने भाऊसाहेब वायकर यांचा पाय मोडला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घरासमोर असलेले उंच पिंपळाचे झाडदेखील या घटनेत होरपळून निघाले. गॅस वितरक कंपनीच्या हलगर्जी पणामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. राहाता पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी भेट घेऊन माहिती घेतली.