Ahmednagar News : लेकरू शेततळ्यात पडलं..आईने ओढणी फेकली..तीही हातून निसटली अन पोटचा गोळा डोळ्यादेखत बुडाला…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पोटचा नऊ वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील पिसोरे खांड येथे घडली आहे. असिफ चांद शेख (वय ९) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

आसिफ हा मित्राबरोबर शेततळ्याकडे गेला अन् पाय घसरून पाण्यात पडला. हा प्रकार आईला समजताच ती तत्काळ शेततळ्यावर पोहोचली. तिने तिची ओढणी पाण्यात बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने टाकली. मुलाने ती ओढणी पकडलीही. मात्र, काही क्षणातच ओढणी मुलाच्या हातून निसटली अन् आईच्या डोळ्यादेखत तो पाण्यात बुडाला.

ही घटना गुरुवारी (दि.१८) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिसोरे खांड (ता. श्रीगोंदा) शिवारातील भाऊसाहेब जगताप यांच्या शेततळ्यात घडली. असिफ शेख हा इयत्ता तिसरीत शिकत होता. तो पिसोरे खांड शिवारातील भाऊसाहेब जगताप यांच्या शेततळ्यावर मित्राबरोबर गेला होता. ते

थे अचानक असिफचा पाय घसरला. तो शेततळ्यातील पाण्यात पडला. शेततळ्यात ५० फूट पाणी असल्याने मांजरी (जि. पुणे) येथील जवानांनी ऑक्सिजनचा आधार घेऊन बुधवारी रात्री असिफचा मृतदेह बाहेर काढला.

घटना हृदयद्रावकच..
मित्राने आरडाओरडा करताच असिफची आई रोशन ही शेततळ्याकडे गेली. तिने स्वतःची ओढणी असिफच्या दिशेने फेकली. त्याने ओढणी पकडलीही. मात्र, ती ओढणी असिफच्या हातातून सटकली आणि तो पाण्यात बुडाला.

शेततळ्यात बुडण्याच्या अनेक घटना
शेतात पाण्यासाठी शेततळी केलेली असतात. यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. शेतीला हे पाणी पुरवून पुरवून वापरले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात अशी शेततळी केलेली आहेत.

दरम्यान ही शेततळी निसरडी झालेली असतात तसेच ही खोल असल्याने पाण्याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना या आधी देखील अहमदनगर जिल्ह्यात घडल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe