Ahmednagar News : शिर्डीत विना नंबरच्या कार ने येऊन शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरलेले ते दोघे संशयित तरूण पोलिसांच्या हाती लागल्याचे विश्वसनीय वृत्त असून पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघे तरूण कोणी दहशतवादी नसून ते दोघे शिर्डीत चोरीचे सोने विकायला आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत, दोघांना ताब्यात घेवून त्यांची दुपारी चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. १७) येथील एका हॉटेलात दोघे जण उतरले होते. ते विना क्रमांकाच्या कारमधून आले. त्यांच्याकडे तीन जड बॅगा होत्या.

त्यांचे आधारकार्ड मॅच न झाल्याने त्यांना खोली खाली करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी हॉटेलसाठी आधी पैसे भरले. परंतु खोली खाली करताना उर्वरित पैसे न घेताच ते निघून गेले. त्यामुळे या तरुणांचा येथे रूम घेण्याच्या हेतूबाबत विविध शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिर्डीत तळ ठोकून आहे. पोलिस त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान शिर्डीत दहशतवादी आले, अशी खोटी अफवा समाजमाध्यमात पसरविण्यात आली होती.
मात्र त्यात तथ्य नसल्याचे आज दुपारी तपासात पूढे आल्याचे समजते. याबाबत विश्वसनीय सूत्राशी संपर्क साधला असता शिर्डीत विनानंबरच्या कारने आलेले ते दोघे तरूण पोलिसांना सापडले आहेत.
त्यांची पोलीस कसून चौकशी करत होते. पोलिसांकडून कळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर तरूण हे दहशतवादी असल्याचा पोलिसांनी साफ इन्कार केला आहे.
ते दोघे शिर्डीत स्वस्तात सोने विक्री करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याबाबत त्या दोघांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.
त्यामुळे शिर्डीत आलेल्या त्या दोन संशयित तरूणांबद्दल सुरू असलेल्या वेगवेगळ्या अफवांना पूर्ण विराम मिळाल्याचे समजते.