बीड जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव मध्यरात्री शंभर टक्के भरला असून, सांडवा ओसंडून वाहत आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता उमेश कंगणकर, शाखा अभियंता गणेश काळे व आबासाहेब नेटके यांनी दिली.
अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तलाव भरल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जामखेड तालुक्यातील फक्त भुतवडा तलावच भरला असून, इतर तलावातील पाणीसाठा ५ ते २० टक्केच आहे.
भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे तर जोडतलावाची पाणी साठवणूक क्षमता ५६ दशलक्ष घनफूट आहे. जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते, दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि. २४ रोजी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाला, तो रात्रभर सुरू होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ रामेश्वर धबधब्याच्यावर असलेला भुरेवाडी तलावदेखील १०० टक्के भरला असून, रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे.
मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे खाली असलेल्या जामखेडजवळील रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने भुतवडा तलाव भरेल की नाही, अशी शंका होती.
मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अखेर शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव शंभर टक्के भरल्याने सध्या तरी जामखेडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
तालुक्यातील मोहरी तलावात सध्या २० टक्के तर खैरी माध्यम प्रकल्पात ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील तलावांतील पाणी पातळी वाढत असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.