Ahmednagar News : मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे विभाग तसेच केंद्रीय मंत्री यांना वारंवार विनंती वजा निवेदने दिली..तरीही ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लागल्या.. अखेर गाव एक झालं.. एकजुटीने पंधरा ऑगस्टला रेल्वे रोको आंदोलन केले.. अन यश आलं..
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस, शिर्डी मुंबई, फास्ट, पुणे अमरावती या तीन गाड्यांना पुणतांबा स्थानकावर थांबा देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
शिडॉला जाणाऱ्या चार गाड्यांना देखील थांबा मिळविण्यासाठी एक महिन्याच्या आत प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात विद्यार्थी, महिला, पुरुष, शेतकरी यासह सुमारे चार हजार नागरिक सहभागी झाले.
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच भुयारी मार्ग रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे पुणतांबेकरांचे म्हणणे होते. त्यासाठी रेल्वेकडे अनेक वेळेस पाठपुरावा केला. मात्र रेल्वेने नुसते आश्वासन दिले. पुणतांबा ग्रामस्थांनी एकजूट करून विशेष ग्रामसभा घेऊन १५ ऑगस्ट रोजी रेल रोको करण्याचा निर्धार केला.
त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व एकत्रित येऊन रेल रोको आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनामुळे रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यावेळी आंदोलक रेल्वे रुळावर जाऊन बसले रेलरोकोमुळे मुंबईहून येणारी वंदे भारत जलद गाडी कोपरगाव रेल्वेस्थानकावर थांबविली. पुण्याहून येणारी कर्नाटक एक्सप्रेसदेखील जवळच्या स्टेशनला थांबविली. आमच्या सर्व जलद गाड्या थांबल्या पाहिजे, या मागणीवर आंदोलन ठाम होते.
पुणे डिव्हिजनल मॅनेजर यांनी आंदोलकांशी मोबाईलद्वारे चर्चा केली. त्यात पुणतांबेकरांच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे सांगितले. तीन तासानंतर यावर तोडगा निघाला.
आंदोलनातील ठळक मुद्दे
मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस शिर्डीसाठी तब्बल दोन तास उशिरा धावली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याव्यतिरिक्त आंदोलन यशस्वी झाले. रेल्वे थांब्यासाठी पुणतांबा पंचक्रोशीतील नागरिक एकवटले आणि त्यांचा विजय झाला.