स्वातंत्र्यदिनी भंडारदऱ्याकडे पर्यटकांची पाठ ! स्टॉलधारकांसह अनेकांचे नुकसान, पण असं झालंच कस?

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर पर्यटन पंढरी म्हणून ओळखला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक तेथे येत असतात. विशेषतः १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी येथे पर्यटकांची मांदियाळी असते.

Ahmednagar News  : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर पर्यटन पंढरी म्हणून ओळखला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक तेथे येत असतात. विशेषतः १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी येथे पर्यटकांची मांदियाळी असते.

यातून हजारोंची उलाढाल होते. स्थानिकांना रोजगार मिळतो. पण यंदा आक्रीत घडलं. यावर्षी पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरवली.

भंडारदरा परिसर निसर्गाच्या नवलाईने नटलेला निसर्ग, वाहणारे ओढे नाले, कोसळणारे धबधबे, तुडुंब भरलेला जलाशय आदींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक स्वातंत्र्यदिनी गर्दी करत असतात. यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून स्थानिकांनी आपले स्टॉल उभारले होते.

एवढेच नव्हे तर वडे, भजे तयार करणाऱ्या स्टॉलधारकांनी सकाळपासूनच वेगवेगळ्या पर्यटन स्थळी आपली तयारी सुरू केली होती. अनेकांनी वड्यांसाठी लागणारे बटाटे उकडून ठेवले होते, तर भज्यांसाठी महाग असणारा कांदाही चिरून ठेवला होता.

एवढेच नव्हे तर काहींनी बेसन पीठही कालवून ठेवले होते मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पर्यटक यावर्षी पर्यटन पंढरीत आले. त्यामुळे या छोट्या-मोठ्या स्टॉलधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

उकडून ठेवलेले बटाटे व चिरलेले कांदे याचे काय करायचे? हा प्रश्न या स्टॉलधारकांपुढे पडल्याचे दिसून येत होते. एकूण या व्यावसायिकांचे यावर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पर्यटकांनी का फिरवली पाठ?
पर्यटकांनी भंडारदरा परिसराकडे पाठ का फिरवली याबाबत अनेक चर्चा सध्या सुरु आहेत. यापैकी एक म्हणजे चार दिवसांपासून भंडारदरा परिसरात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पाऊस गायब असल्याने पर्यटकांची पावले इकडे वळली नाहीत.

काहींचे म्हणणे आहे. तसेच या भागात अनेक ठिकाणी नवीन काम झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे हे देखील पर्यटक न येण्याचे महत्वाचे कारण सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe