Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काही तासांच्या अंतराने दोन अपघात ! दोघांचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News : नगर शहराजवळ सोमवारी (दि.६) दोन रस्ते अपघात झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे ४ च्या सुमारास नगर कल्याण रोडवर टाकळी खातगाव गावच्या शिवारात तर दुसरा अपघात नगर मनमाड रोडवर बोल्हेगाव फाटा परिसरात सकाळी ७.३० च्या सुमारास घडला आहे.

कल्याण रोडवरील अपघातात निलेश दत्तात्रय ढोणे (वय २१, रा. भाळवणी ता. पारनेर) हा युवक मयत झाला आहे. तो सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास भाळवणी वरून कल्याण रोडने मोटारसायकलवर नगर कडे येत असताना

टाकळी खातगाव गावच्या शिवारात हॉटेल साईराज समोर एका भरधाव वेगात चाललेल्या मालट्रकने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरा अपघात नगर मनमाड रोडवर बोल्हेगाव फाटा परिसरात हॉटेल चैतन्य समोर सकाळी ७.३० च्या सुमारास घडला. यात एम आयडीसीतील एका कंपनीत काम करणारे किरण गंगाधर कडेकर (वय ४१, रा. बालिकाश्रम रोड, नगर, मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला आहे.

ते कंपनीत कामाला मोटारसायकलवर जात असताना बोल्हेगाव फाटा येथे एका मालवाहू टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात ते जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचार सुरु असताना रात्री १० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe