१५ ऑगस्टला भंडारदऱ्याला जायचंय? वाहतुकीसह अनेक गोष्टींत बदल, वाचा सविस्तर

अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्यदिनी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबविण्यात आला असल्याची माहिती राजूर पोलिसांनी दिली आहे. भंडारदऱ्याला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी एकेरी वाहतुकीच्या मागार्चा अवलंब करावा, असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
pryatan

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्यदिनी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबविण्यात आला असल्याची माहिती राजूर पोलिसांनी दिली आहे.

भंडारदऱ्याला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी एकेरी वाहतुकीच्या मागार्चा अवलंब करावा, असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असुन दरवर्षी येथे हजारो पर्यटक वर्षा ऋतूमध्ये भेट देत असतात.

भंडारदराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, कळसुबाई शिखर, आशिया खंडातील सर्वात खोल सांदण दरी, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, रंधा धबधबा, वसुंधरा फॉल, नान्ही फॉल, बाहुबली धबधबा, नेकलेस फॉल, घाटघर येथील कोकणकडा असे प्रेक्षणीय स्थळे आहेत.

पावसाळ्यामध्ये या प्रेक्षणीय ठिकाणांना पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. या दरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत असते. सध्या भंडारदरा धरण भरलेले असुन भंडारदरा धरणाच्या अभयारण्यामध्ये धबधब्यांच्या मालिका सुरू आहेत. तसेच स्वातंत्र्यदिनी भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात.

याही वर्षी भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला असून तसे आदेश राजूर पोलिसांना देण्यात आले आहेत.

रंधा धबधबा येथून भंडारदरा धरणाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असुन भंडारदऱ्याला वाकी फाटा / वारंगधुशी फाटा, चिचोंडी फाटा, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण असा मार्ग राजुर भागातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी राहणार असून नाशिक मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंघुशी फाटा, चिचोंडी, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण असा असणारा असून रंधा धबधबामार्गे पर्यटकांना बाहेर पडता येणार आहे.

एकेरी वाहतुकीचा मार्ग हा फक्त स्वातंत्र्य दिनी अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली आहे. पर्यटकांनी दिलेल्या मार्गावरूनच भंडारदरा पर्यटनाचा आनंद लुटावा असे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे.

राजुर पोलिसांकडून स्वातंत्र्यदिनी एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला असला तरी या एकेरी वाहतुकीचा फटका भंडारदरा परिसरातील व्यावसायिकांना बसत आहे. प्रत्यक्ष कोणी बोलत नसले तरी एकेरी वाहतुकीला विरोध असल्याचे निदर्शनास येत आहे.

भंडारदरा धरणाजवळील सांडव्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविला गेला तर भंडारदऱ्याचे पर्यटन अगदी शांततेत होणार आहे. त्यामुळे राजुर पोलिसांनी भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळच अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण होणार आहे.

अहमदनगरचे माजी पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या कालखंडामध्ये भंडारद? ऱ्याला प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये एक दंगल पथक नेमले जात होते. त्यावेळी पर्यटकांना पर्यटन करताना कोणतीही अडचण भासत नव्हती. अगदी त्याच प्रकारे जर पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यात आली तर भंडादऱ्याचे पर्यटन अगदी सुव्यवस्थित होण्यास मदत होणार होईल, असे शेंडीचे माजी सरपंच दिलीप भांगरे यांनी सांगितले आहे.

भंडारदऱ्याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असणाऱ्या पर्यटनस्थळांना सालाबादप्रमाणेच पर्यटकांना जावे लागणार असून पर्यटक घाटघर फाट्‌यावरील टोलनाक्यावरून अभयारण्यात प्रवेश करतील व रतनवाडी टोलनाक्यावरून बाहेर पडतील. अशी माहिती सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी दत्ता पडवळे यांनी एका मीडियाशी बोलताना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe