Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती

Published on -

अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिलेले दिसले. उत्तरेत तरी पाणलोटात पाऊस झाला दक्षिणेत मात्र अनेक ठिकाणी पाऊस आलाच नाही. त्यामुळे पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून जिल्ह्यात टंचाईची स्थिती विदारक होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे भूजल पातळी ९ मिटरपर्यंत खालावली असल्याचे दिसते. विहीरींनी तळ गाठला असून विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.

वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने जिल्ह्यातील २०२ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी मार्चमध्ये मोजली. या मोजणीचा अहवाल करताना मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी झालेली सरासरी घट अथवा वाढ नोंदवण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यात भूजल पातळीत घट दाखवण्यात आली आहे. ही घट मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत तीन मिटरपेक्षा अधिक खालावल्याचे दिसून आले आहे.

शेतीला पाणी नाही, पिण्याचेही हाल
विहिरींसह विंधन विहिरींना आता पाणी नसल्याने, विहीर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना बागा जगवण्यासाठी खासगी टँकरवर हजारोंचा खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यातही अपेक्षीत भाव मिळाला नाही शेतकऱ्याचे आर्थीक गणित कोलमडणार आहे.

यंदा मार्चमध्ये जामखेड तालुक्यात सर्वाधिक ९.१८ मिटर पाणी पातळी खलावली आहे. त्याखालोखाल कोपरगाव तालुक्यात ९.१३ वर पाणीपातळी नोंदवण्यात आली. मागील वर्षी मार्च २०२३ च्या तुलनेत सर्वाधिक ३.२४ मिटरची घट शेवगाव तालुक्यात, त्याखालोखाल ३.२३ मिटरची घट मात्र अकोले तालुक्यात नोंदवण्यात आली.

यंदा टंचाईच्या झळा अधिक तिव्र होतानाचे चित्र आहे. यापार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांवर प्रशासनाकडून अधिक भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाभर पाणीटंचाईच्या झळा
जिल्हाभर पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल २७६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, ६५९ खेपा मंजूर आहेत. परंतु, यामध्ये उत्तर-दक्षिण अशी दरी निर्माण झाल्याचे दिसून येते. एकट्या अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघात १५३५ गावे-वस्त्यांवर, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील १७५ ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. पाथर्डीत ८३ गावे व ४४८ वस्त्या अशा एकूण ५३१ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe