Ahmednagar News : लोखंडी तलवारी तयार करणाऱ्या दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून १९ हजार रुपयांच्या नऊ तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी का बनवत होते अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत.
ही घटना कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दि. २८ जुलै रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, त्या शहरातील खडकी प्रभागात भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या मागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारधार शस्त्र, तलवारी तयार करण्याचा उद्योग सुरु आहे.

त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जाऊन पाहाणी करीत होते. इतक्यात पोलीस आल्याची चाहूल लागताच संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे, बक्या ऊर्फ महेश म्हस्के हे दोघे तेथून आपल्या हातील मोबाईल व बनवलेल्या ९ तलवारीसह इतर साहित्य तिथेच टाकून पळून गेले.
पोलिसांना तलवारी बनवणारा कारखाना असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली. देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे,
उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता, तिथे ९ नवीन तयार केलेल्या तलवारी, हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या ७ चकत्या, लोखंडी ऐरण, हातोडा, दोन मोबाईल, असा सर्व मिळून १८ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असून तिथे तात्पुरत्या स्वरुपात किरण सोळसे व महेश म्हस्के दोघे (रा. खडकी) यांना भाड्याने दिल्याचे समजले. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.