Ahmednagar News : शासन विविध स्तरावर विविध घटकांसाठी अनेक योजना राबवत असते. शासनाची अशीच एक योजना आहे ती म्हणजे कन्यादान योजना.
ही योजना समाज कल्याण विभागामार्फत चालवली जाते. या योजनेंतर्गत पालकांना २० हजार रुपये दिले जातात. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावल्यास या योजनेचा लाभ मिळतो.
विशेष म्हणजे ज्या संस्थेमार्फत हे विवाह होतात त्यांनाही ५ हजार रूपये प्रती जोडपे अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत ४० दाम्पत्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
समाजकल्याण विभागाची ही कन्यादान योजना असून यात मागास प्रवर्गातील मुलींच्या पालकास २० हजार रूपये अनुदान दिले जाते. कोरोना काळात काही वर्षे ही योजना ठप्प होती. परंतु आता योजना पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.
जिल्ह्यातून ४० प्रस्ताव
कन्यादान योजनेंतर्गत नगर जिल्ह्यातून ४० दाम्पत्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून मिळाली.
नेमकी काय आहे योजना? कोण घेऊ शकते लाभ?
लग्न समारंभावर अमाप खर्च होतो. हा खर्च पाहता अनुसूचित जाती (नवबौद्ध), विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील दाम्पत्याचा विवाहावर होणार खर्च थांबविण्यासाठी सामूहिक विवाह हाच एक पर्याय असणार आहे.
यासाठी समाजकल्याण विभागामार्फत कन्यादान योजना राबविली जाते. यात वधू पित्याला २० हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. शिवाय असे विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही प्रोत्साहनपर ५ हजारांचे अनुदान प्रती जोडपे दिले जाते.