अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : मॉरिशसमध्ये पाच ते सहा श्री साईबाबांची छोटी मंदिरे असून, गंगालेख येथे भव्य मंदिर उभारणार असल्याची माहिती मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्वेमंत्री एलन गेणू यांनी दिली.
गेणू हे श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मॉरिशसचे जी. ए. गणू, स्टर्लिंग प्रकाशनचे अध्यक्ष सुरेंद्र के. घई, राकेश जुनेजा आदी उपस्थित होते.
गेणू म्हणाले, मॉरिशसमध्ये सुमारे ६० टक्के हिंदू लोक वास्तव्य करतात. तसेच सुमारे ५ ते ६ श्रीसाईबाबांची छोटी मंदिरे असून, या ठिकाणी भाविक बाबांच्या दर्शनाकरिता गर्दी करतात. यामुळे आम्ही गंगालेख येथे श्री साईबाबांचे भव्य मंदिर बांधण्याचे ठरविले असून, यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असल्याचे सांगून आज श्री साईबाबांच्या दर्शन घेवून अतिशय आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.