अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका शेतकर्याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे.
ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली आहे. या संदर्भात प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी सहा ठगांविरूद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे या शेतकर्याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने आरोपी वैभव अनंत चेमटे, अनंत दत्तात्रय चेमटे, भुषण अनंत चेमटे (सर्व रा.भाळवणी ता. पारनेर जि. अहमदनगर) तसेच बाळासाहेब दगडू सालके, भाऊसाहेब सदाशिव सालके (दोघे रा.काळकूप ता.पारनेर जि.अहमदनगर), निलेश भाऊसाहेब शिंदे (रा.टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि.अहमदनगर)
या सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे. दरम्यान, फसवणूक करणार्या या सहा ठगांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेमुळे नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.