Shirdi News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येऊन गेले. त्यांचा हा खास दौरा विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी होता. यातीलच एक भाग म्हणजे साईबाबा मंदिरातील नवीन वातानुकूलित दर्शनरांगेचे उदघाटन.
येथे दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. त्यांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प उभारला आहे.
दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेण्याची क्षमता आहे. आता ही दर्शनरांग शुक्रवारी ( दि.२७) पासून प्रायोगिक तत्वावर खुली करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारनंतर सशुल्क पेड पासद्वारे हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन रांगेतून दर्शन घेतले. आठवडाभरानंतर ही दर्शन रांग भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
मोदींच्याच हस्ते झाले होते उदघाटन
साईबाबांच्या दर्शनासाठी रोज लाखो भाविक येतात. दर्शनासाठी त्यांना रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी या प्रकल्पाबरोबच आंतरराष्ट्रीय दर्जाचा शैक्षणिक प्रकल्प उभारण्यात निर्णय घेतला.
१९ ऑक्टोबर २०१८ रोजी या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. त्यानंतर चार वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यात येऊन त्याचा लोकार्पणही करण्यात आला.
असा आहे तीन मजली दर्शनरांग प्रकल्प
बांधकाम क्षेत्रफळ २ लाख ६१ हजार ९२० चौरस फूट, घडीव दगडाची वातानुकुलित दर्शन रांग, प्रवेशासाठी ३ भव्य प्रवेशद्वार आहेत. एकाचवेळी सुमारे ४५ हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाइल, चप्पल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, बायोमेट्रिक पास काउंटर ४८, लाडू प्रसाद काउंटर २०, साईंची विभूती काउंटर २,
साईंचे कापड कोठी काउंटर २, बुक स्टॉल्स २, देणगी कांउंटर १०, चहा, कॉफी काउंटर व बॅग स्कॅनर ६, सेक्युरिटी चेकअप सेंटर २५, सेक्युरिटी चेक काउंटर्स २५, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी १० हजार क्षमतेचे १२ वातानुकुलित हॉल, आरओ प्रक्रियेचे शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र असा हा भव्य प्रकल्प आहे.
असे आहे शैक्षणिक कॉम्प्लेक्स
इंग्लिश मीडियम स्कूल, मुलींसाठी स्वतंत्र शाळा, ज्युनियर व सीनियर कॉलेज, आयटीआय स्वतंत्र इमारती, प्रयोगशाळा, आर्ट हॉल, वाचनालय, भोजनकक्ष, ऑडोटोरीयम, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, स्वतंत्र स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये स्वतंत्र जिम, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस कक्ष.
५० हजार दगड
दर्शनरांग प्रकल्पासाठी उच्चत्तम दर्जाचे ग्रेनाईट राजस्थानातून आणले असून भिंतीसाठी काळा पाषाणी दगड लोणावळा, नांदेड, नेवासे येथील आहे. १० हजार चौरस फुटाच्या बांधकामासाठी तब्बल ५० हजार दगड घडवण्यात आले. दोन वर्षांत बिहार, बंगाल येथील पन्नास कारागिरांनी ही वास्तू घडवली.