शिर्डी येथील साई मंदिरात फुल हार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फुल विक्रेते, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, कारण विषय न्यायालयीन होता. बंदीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.
शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली. या समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे 384 हेक्टर क्षेत्रावर फुलांची शेती करणारे शेतकरी, त्यांच्यावर अवलंबून मजूर, व्यापारी आणि तरुण बांधव यांच्यात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी फुल विक्री मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, लवकरच शेतकरी, व्यापारी, नगरपरिषद, आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीद्वारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की, कोणाचेही नुकसान होणार नाही आणि भक्तांची लूट होणार नाही.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले, तसेच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला.