Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात बंडाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.
येथून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. यामुळे विद्यमान आमदार लहू कानडे हे प्रचंड नाराज असून त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी लगेचच राजधानीकडे आगे कूच केली.

राजधानी मुंबईत जाऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे लहू कानडे हे शिंदे गटात जातील आणि हाती धनुष्यबाण घेत विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशा चर्चांना गत काही तासांपासून नगरमध्ये ऊत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लहू कानडे हे प्रवेश करतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
असे झाल्यास काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असेल. लहू कानडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी होईल आणि महायुतीची ताकद वाढणार आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणालेत की, घराणेशाहीच्या ताब्यातून काँग्रेस पक्ष संघटना मुक्त करून तळागाळापर्यंत आपण पक्षाची उत्तम संघटना बांधली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचाय याचा फैसला इथली जनताच करणार आहे. दरम्यान त्यांनी 28 तारखेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणारचं असे जाहीर केले आहे.
दुसरीकडे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवसेनेकडूनही याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. परंतु कानडे यांच्या पक्षप्रवेशाला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कोणताच विरोध नसल्याचे दिसते. परंतु कानडे यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे. यामुळे आता लहू कानडे हे शिंदे गटात येणार का आणि त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.