अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजुने आत प्रवेश केला.
हा प्रकार लक्षात येताच देविदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी देविदास पिंपळे यांच्यासह घरातील महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास दिली.
त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ पिंपळे वस्तीवर भेट दिली. त्यांनी जखमी देविदास पिंपळे व इतरांना औषधोपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविले.
पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता तेथे दरोडेखोरांची मोटारसायकल आढळून आली आहे. सकाळी घटनास्थळी अहमदनगर येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम