Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी फायनल करण्यास सुरवात केली आहे.
राजकीय नेत्यांनी देखील आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभेसाठी महायुतीमध्ये तसेच महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथे देखील इच्छुकांची संख्या खूपच वाढलेली आहे.
खरे तर नगर दक्षिण लोकसभेची जागा महायुतीमध्ये भाजपाकडे जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडे जाणार आहे. मात्र भाजपाने आणि शरदचंद्र पवार यांच्या गटाने अजूनही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तथापि, बीजेपीमधून वर्तमान खासदार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा अधिक पाहायला मिळत आहे.
मात्र असे असले तरी विखे यांच्या नावाला बीजेपीमधूनच विरोध पाहायला मिळत आहे. कारण की, नगर दक्षिणच्या जागेवर विधान परिषदेचे भाजपा आमदार राम शिंदे यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. याशिवाय भानुदास बेरड यांच्या देखील नावाची चर्चा या जागेसाठी होत आहे. बीजेपीने या जागेसाठी मंथन देखील सुरू केले आहे.
गुरुवारी बीजेपीने निरीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार देवयानी फरांदे यांना नगरमध्ये पाठवले होते. यावेळी बीजेपी पक्षाच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतलीत. तसेच याबाबतचा अहवाल भाजपा प्रदेश कार्यकारणीकडे पाठवला आहे. आता महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणीकडून हा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्त होणार आहे.
दरम्यान, निरीक्षक मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार देवयानी फरांदे यांनी गुरुवारी घेतलेल्या या बैठकीत काही निवडक पदाधिकाऱ्यांपैकी अनेकांनी भाजपाच्या निष्ठावंत लोकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे आणि भानुदास बेरड यांच्या नावाबाबत पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला. यामुळे आता केंद्रीय नेतृत्वाकडून या तिघांपैकी कोणाला उमेदवारी दिली जाते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
दुसरीकडे, या जागेवरून महायुतीमधील अजित पवार यांच्या गटातील आमदार निलेश लंके यांनी देखील निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती राष्ट्रवादीकडून या जागेसाठी निलेश लंके यांचे नाव पुढे केले जात होते. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजितदादांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अजित दादांसोबत निलेश लंके यांनी देखील सरकारमध्ये जाण्यास प्राधान्य दिले.
आता मात्र नगर दक्षिण लोकसभेची जागा महायुतीकडून बीजेपीला मिळणार हे जवळपास नक्की आहे. अशा परिस्थितीत लंके पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सामील होणार का ? अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. कारण की त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत.
मध्यंतरी त्यांची पत्नी सौ राणी लंके यांनी या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा देखील काढली होती. याशिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी केलेल्या विकास कामांच्या बॅनर मध्ये शरद पवार यांचा देखील फोटो झळकला होता. तसेच त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या गटातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य नगर शहरात आणले आहे. यामुळे निलेश लंके पुन्हा शरद पवार यांच्या गटात माघारी जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
दुसरीकडे लंके यांनी घरवापसी केली नाही तर शरद पवार यांच्या गटाकडे रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, दादा कळमकर असे काही ऑप्शन्स आहेत. विशेष म्हणजे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार हे जाहीर केले आहे. तथापि याबाबत शरद पवार यांच्या गटाकडून अधिकृत उमेदवाराची अजूनही घोषणा झालेली नाही. यामुळे महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून या जागेसाठी कोणाला संधी दिली जाते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.