Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा खा. निलेश लंके यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर सुजय विखे पाटील यांच्या जनसंपर्कवरून बरीच चर्चा झाली.
त्यांचा जनसंपर्क कमी असतो, ते लोकांच्या कार्यक्रमाला येत नाहीत आदी अनेक टीकास्त्र त्यांच्यावर त्यावेळी सोडण्यात आले. आता याच मुद्द्याला धरून त्यांनी मार्मिक भाषण केले आहे.

निमित्त होते एका पतसंस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे. आलेल्या अपयशातून मी भरपूर काही शिकलो आहे. विकासकामापेक्षा जनसंपर्काला महत्त्व देणारेही काही नागरिक असल्याने
आता यापुढे दशक्रिया, वाढदिवस, जागरण-गोंधळ सारख्या खासगी कार्यक्रमांना मी हजेरी लावणार आहे. दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी तेथे उपस्थित असेल असा टोला त्यांनी लगावलाय.
नेमके काय म्हणाले डॉ. सुजय विखे पाटील?
गेल्या पाच वर्षांत मला खूप अनुभव आला आहे. मतदान व विकासाचा काहीही संबंध नाही. माझा अनुभव असा आहे की, जितके रोहित्र दिले तेवढाच शॉक माणसे आपल्याला देतात.
काळ बदलतोय तसा विचारही बदलत चालला आहे. विचारधारा बदलत आहेत. मला दुर्दैवाने अद्यापपर्यंत जनतेस नेमके काय पाहिजे हेच कळले नाही. बदललेले राजकारण ओळखण्यातच मला खरं तर अपयश आले.
आतापर्यंत अनेक लोक माझ्यासोबत राजकारणात आलेत. आम्ही सोबतच विकासकामे करत फिरायचो. हे करताना अनेकदा मी त्या लोकांना सांगायचो की तुम्ही जितका विकास कराल तितके विरोधक तुम्हाला पराभूत करण्यासाठी एकत्र होतील.
परंतु दुर्दैव हे की त्यांनी विकासकामे करूनही त्यांचा पराभव झाला व त्यांच्या पराभवातूनही मला अक्कल आली नाही अशी खंत विखे पाटलांनी व्यक्त केली. आता मी ठरविलेय की सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहायचं.
वाढदिवस असो की जागरण मी येणार. रोहित्र, रस्ते असे काही तुम्ही मागू नका पण दशक्रियाविधीचे मात्र नक्की सांगा, कावळ्याच्या आधी मी तेथे असेल असा टोला लगावला.