स्वतः मांडलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करायचा असेल, तर माजी मंत्र्यांनी अगोदर पापक्षालन करुन जनतेची माफी मागितली पाहिजे.
त्यांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याप्रमाणेच समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याच्या पापाचे श्रेयही पदरात घ्यावे, अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
येथील काँग्रेस पक्षाने काल सोमवारी सकाळी संगमनेर बस स्थानकावर जायकवाडीला पाणी सोडण्यावरून आंदोलन केले. पाणी सोडण्याच्या कारणाने करण्यात आलेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, अमोल खताळ यांनी म्हटले आहे की, जिल्ह्याच्या मानगुटीवर समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा बसविल्यामुळेच माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांना मनातून खंत वाटत असेल, यामुळे ते आंदोलनात सहभागी झाले नसावेत.
हक्काच्या पाण्यासाठी ५० वर्षे तहानलेल्या दुष्काळी पडूयात एकेकाळी पाणी प्रश्नाचे आमदार म्हणून पोकळ भाषणं देणाऱ्या माजी मंत्र्यांना आता काही गोष्टींचा सोयीस्कर विसर पडला आहे. ज्या समन्यायी पाणी वाटप कायद्याविरुद्ध त्यांचेच लाभार्थी आंदोलन करत आहेत.
त्या कायद्याचे जन्मदातेच खुद्द आ. बाळासाहेब थोरात आहेत. विधेयक मांडून मंजूर करुन घेताना त्यांना फुकट मिळालेल्या सत्तेची कोणती नशा होती? त्यांनी हा कायदा करुन दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी दुसऱ्याला नेऊन दिले.
मराठवाड्यातील स्वतःच्या नातलगांना देण्यासाठी त्रुटी समजून न घेता कायदा केला का? असा सवालही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनातून काँग्रेस पक्षाची केविलवाणी परिस्थिती उघड झाली आहे.
राज्यात नंबर वन म्हणवणाऱ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात पन्नासही कार्यकर्ते सहभागी होवू शकले नाहीत. लाभार्थी आणि ठेकेदार यांचा सहभाग असलेल्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी आणि नागरीकांनी पाठ फिरवलीच.
परंतू यापेक्षाही आता राज्यातील युती सरकारमुळे निळवंडे धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे या शेतकऱ्यांनीसुद्धा या आंदोलनाकडे पाठ फिरवली. या आंदोलनातील खोटेपणा त्यांच्याही लक्षात आला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.