Ahmednagar Politics : शरद पवार यांनी चिंता करायचे सोडून दिले पाहिजे. संस्था, बँका, कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. जिल्ह्याचे लोक समर्थ आहेत.
एवढे वर्षे महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले. ते आता संपुष्टात येत आहे. याची त्यांच्या मनात खंत आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. विखे पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण,
युवा कार्य प्रशिक्षण व इतर शासकीय योजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, झेडपीचे सीईओ आशिष येरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विनायक देशमुख आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. याकडे पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की सहकारी साखर कारखाने, बँका आदींचा कारभार पाहण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे.
त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे सोडून द्यावे. त्यांची राज्यातील सहकारी संस्थांवरील पकड कमी होत चालली आहे. त्यांची त्यांना खरी खंत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
सुजय विखे चांगलाच निर्णय घेतील
सुजय विखे-पाटील यांच्या राहुरी किंवा संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, सुजय खासदार राहिले आहेत. राजकीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांनी जो काही निर्णय घेण्याचा विचार केला असेल तो चांगलाच असेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.