Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांपैकी एक म्हणजे गडाख कुटुंब. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे योगदान आहे.
त्यानंतर आ. शंकरराव गडाख यांनी आपले राजकीय स्थान टिकवून ठेवले. राज्यात झालेल्या राजकीय फुटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. त्यांच्या रिलेटेड काही प्रकरणे चौकशीसाठी समोर येत आहेत.
निधी नाही, संस्थेच्या चौकशा सुरु..
तीन वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यावेळी अनेक आमदार महायुतीसोबत गेले. मात्र आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.
ते एकनिष्ठ राहिले. याचा फटका गडाख यांना बसत असल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघासाठी निधी नाही, संस्थेच्या चौकशा सुरू झाल्या, कारखाना अडचणीत, अशा विविध संकटांचा सामना गडाख यांना करावा लागत आहे.
‘त्या’ प्रकरणात अटकेची शक्यता?
सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीने वनजमिनीवर बेकायदा पद्धतीने ताबा घेतला. हजारो झाडांची कत्तल करून इमारत बांधली. तसेच संस्थेने खोटे कागद बनविले आहेत.
त्यामुळे संस्थेची जागा वनविभागाने ताब्यात घेऊन मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष, विश्वस्तांवर कारवाई करावी, असा अर्ज नुकताच मुंबई येथील कुलाबा पोलिस ठाण्यात काहीजणांनी दाखल केला आहे.
या प्रकरणी कुलाबा (मुंबई) येथील पोलिसांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, प्रशांत गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या ‘मुळा एज्युकेशन’चे संचालक असलेले आमदार शंकरराव गडाख, प्रशांत गडाख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
आताच का फिरू लागले तपास चक्र?
विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्यात. साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु या निवडणुकांच्या अनुशंघाने अनेक गणिते आताच फिरायला लागलीयेत.
नेवासे मतदार संघ हा गडाखांचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदार संघात विधानसभेला गडाखांचा ‘वट’ जास्त चालेल असे म्हटले जात आहे. आता गडाखांचा विचार केला तर ते सहकारातील नेते आहेत.
कारखाना असेल किंवा संस्था असेल यामुळे गडाखांचा संपर्क किंवा गडाखांचा राजकीय परिणाम हा नेवास्यासह राहुरी,कोपरगाव,पाथर्डी शेवगाव मधील काही भाग आदींपर्यंत होतो. त्यामुळे आगामी निवडणुकांत गडाखांचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुती त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे अशी चर्चा सध्या सुरु आहे.