Ahmednagar Ashti Railway : आष्टीहून अहमदनगरकडे सोमवारी दुपारी येणारी गाड़ी क्रमांक ०१४०२ न्यू आष्टी ते अहमदनगर या डेमो रेल्वे गाडीच्या पाच डब्यांना नारायणडोह परिसरात दुपारी तीन वाजता आग लागली. गार्ड-साइड ब्रेक व्हॅन आणि त्याला लागून असलेल्या डब्यांना ही आग लागली. अग्निशामक दलाच्या चार बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अहमदनगर डेमो रेल्वेच्या पाच डब्यांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची चार स्तरीय समितीकडून मंगळवारी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा दिवसांत ही समिती या दुर्घटनेची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.
या चौकशी अहवालात आगीबाबत जबाबदार असणाऱ्यांना दोषी ठरवण्यात येणार आहे. दरम्यान आगीच्या घटनास्थळाचे फॉरेन्सिक नमुने जमा करून ते प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
रेल्वे आगीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली चारस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत रेल्वेच्या विविध विभागातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
चौकशी समितीने मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच कर्मचारी व अधिकारी यांच्याशी देखील या समितीने चर्चा केली. आगीच्या दुर्घटनेबाबत फॉरेन्सिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
प्राथमिक चौकशीत या आगीत पाच कोचचे नुकसान झाले असून, कोचच्या वरच्या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेनंतर रेल्वे चाकाचे नुकसान झाले नसल्याने ते पुन्हा वापरता येणे शक्य आहे. असे येवले यांनी सांगितले.
समितीच्या अहवालानंतरच आगीचे कारण होणार स्पष्ट
आष्टी अहमदनगर रेल्वेच्या पाच डब्यांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी रेल्वेकडून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.चौकशी समितीच्या अहवालानंतर यात किती नुकसान झाले शिवाय आगीचे कारण स्पष्ट होणार आहे. अहवालात दोषी असलेल्यांना जबाबदार धरले जाणार आहे.