ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगार युवकाचा टिप्परखाली येऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आता आहे. जामखेड – सौताडा महामार्गावर ही घटना घडली आहे.
गणेश बापू फुलमाळी (वय २०, रा. कानडी, ता. आष्टी) असे मृत कामगाराचे नाव आहे.अंगावरुन गाडी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोलपंप समोर कामगार गणेश फुलमाळी याचे काम सुरु होते. पहाटे तीनच्या दरम्यान तो रस्त्यावर बसलेला होता. याचवेळी खडीचा हायवा टिप्पर त्या ठिकाणी आला व मोठा अपघात झाला.
हा टिप्पर त्याच्या थेट अंगावरुन गेला. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. या कामाबाबत सध्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या रस्त्याच्या कामावर असणारे अनेक कामगार दारूचे नशेत असतात अशी माहिती मिळाली आहे.
हे इतके मोठे काम सुरु असतानाही या कामगारांकडे सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षित कोणतेही साधन नाहीत. या निष्काळजी धोरणामुळेच कामगाराचा बळी गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकां केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस पथक दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठविले. गणेशच्या पश्चात तीन भाऊ, आई-वडील असा परिवार असल्याचे समजते.