अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : येथील लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यायाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
नागवडे म्हणाले, लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठाण गेली अकरा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहे. व्याख्यानमालेचे हे बारावे वर्ष असून, यापूर्वी राज्यभरातील अनेक वक्त्यांनी विचार मांडलेले आहेत. तीन दिवसीय व्याख्यानमालेची सुरुवात शुक्रवारी(दि.१७) सामाजिक कार्यकर्ते भावेश भाटिया ‘अंधारातून उजेडाकडे’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.
शनिवारी नाशिक येथील सह्याद्री कृषी व उत्पादने कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे हे ‘भारतीय शेती आणि कृषी उद्योग’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. तर रविवारी निलेश दिवटे हे ‘लोकनेते शिवाजीराव नागवडे यांचे कार्य’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी यावेळी केली.
नागवडे पुढे म्हणाले, गुरुवारी प्रा.डॉ. योगेश बोडखे यांच्या उपस्थितीत जिमखाना डे साजरा करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
या समारंभासाठी जेष्ठ साहित्यिक व कथाकथनकार आप्पासाहेब खोत हे प्रमुख अतिथी तर डॉ.एन्.आर सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नेते बाबासाहेब भोस भूषवणार आहेत.