महाराष्ट्रात सर्वात प्रथम २००७ मध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्ष लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे.पण आता तुम्ही त्याच्या नादी लागून भावनिक होऊ नका, नगर तालुक्याची लेक असलेल्या राणी लंके यांनाच या निवडणुकीत मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नगर तालुका महाआघाडीचे नेते बाळासाहेब हराळ यांनी केले.
पारनेर – नगर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.राणी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे शुक्रवारी (दि.१५) रात्री जाहीर सभा झाली. या सभेत बाळासाहेब हराळ यांच्या सह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर टीकास्र सोडले.
हराळ म्हणाले नगर तालुका महाआघाडीला प्रवरेची नजर लागली आहे. आमच्या मित्राला सर्वांनी सांगितले. टेंडर भरू नको, आम्ही या पूर्वी भरलेले टेंडर फेल गेलेले आहे. फक्त लावालावी करून द्यायची आणि गंमत बघायची ही लोणीकरांची सवय आहे.
त्यांचे टेंडर भरून पापाचे वाटेकरी होऊ नका, पण त्यांनी नाही ऐकले. आता तुम्हीही त्यांचे ऐकू नका भावनिक होऊ नका. राणी लंके यांच्या रूपाने नगर तालुक्याची लेक आमदार होणार आहे.प्रताप शेळके म्हणाले, यापूर्वी २००९ व २०१४ च्या निवडणुकांमध्ये मी आणि माधवराव लामखडे यांनी डोकं लावलं होत.
त्यामुळे आमच्या मित्राला सांगितले कुठही डोकं लावण्यात अर्थ नाही, तरी त्याने लावलेच. पण तुम्ही भावनेच्या भरात नव्हे तर विकासासाठी राणी लंके यांना मतदान करा असे आवाहन केले.
सासरपेक्षा माहेराकडे जास्त लक्ष देणार – राणी लंके
उमेदवार राणी लंके यावेळी म्हणाल्या, कुठल्याही महिलेची जास्त ओढ ही सासरपेक्षा माहेराकडे जास्त असते. त्यामुळे मी आमदार झाल्यावर नगर तालुक्याला जास्तीत जास्त निधी विकास कामांसाठी देईल. या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा माझा मानस आहे.
त्यासाठी मला माहेरच्या लोकांची म्हणजे नगर तालुक्याची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी, माजी पंचायत समिती सभापती नंदा शेंडगे, राष्ट्रवादीच्या पारनेर तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे, योगीराज गाडे. राधाकृष्ण वाळूंज, अंकुश शेळके, कृषी पदवीधर संघटनेचे महेश कडूस, स्वाती धामणे,
गजानन पुंड, शहाजान तांबोळी, ऋषीतेज काळे आदींची भाषणे झाली. सभेस तालुका दुध संघाचे चेअरमन गोरख काळे, संचालक भाऊसाहेब काळे, राजाराम धामणे, विद्याताई भोर, जयसिंग कडूस, अमोल कडूस यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.