पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत ही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्वेवरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, जवळा, वडनेर हवेली गटेवाडी, पारनेर येथील शेकडो शेतकऱ्यांचे कांदा, मका, वाटाणा, ऊस, फळबागांसह मोठे नुकसान झाले. तब्बल चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावरील पिंकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे होऊनही मदत मिळेना. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.
सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी नुकसान भरपाई जाहीर केली. काही शेतकऱ्यांना तातडीने पैसे दिले. परंतु अद्यापी अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या त्रुटी सांगून अजूनपर्यत भरपाई दिली नाही. याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता, सर्व्हर बंद होते अशी कारणे सांगितली जातात.
येत्या १्५ दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून तसे झाल्यावर ही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नारायण गायकवाड, संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, बी. ए. भगत यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
तालुक्यात पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे महसूल विभागाकडे जमा झाले. मात्र, महसूल विभागाच्या ढिम्म कारभारामुळे व काही लोकांच्या गलथानपणामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत नाहीत. याकडे तहसीलदारांनी लक्ष देणें गरजेचे आहे असे मत मांडत शेतकऱ्यांनी आता आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.