श्रीगोंद्यावरून अडले महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे; श्रीगोंदा मतदार संघासाठी ठाकरे गटाचा आग्रह

महाविकास आघाडीमध्ये राज्यातील अनेक जागा संदर्भात तिढा असल्याचे समोर येत आहे. अगदी याच अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाचा विचार केला तर या विधानसभा मतदारसंघावर देखील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने  दावा केला असून हा मतदारसंघ मिळावा यासाठी पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झाली असून आता त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. महायुतीच्या संदर्भात बघितले तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये जागावाटप जवळजवळ पूर्ण झालेले आहे.

परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर  जागा वाटपा संदर्भातला तिढा प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात दिसून येत असून गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये वाद झाल्याचे समोर आले होते.

अजूनही महाविकास आघाडीमध्ये राज्यातील अनेक जागा संदर्भात तिढा असल्याचे समोर येत आहे. अगदी याच अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाचा विचार केला तर या विधानसभा मतदारसंघावर देखील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने  दावा केला असून हा मतदारसंघ मिळावा यासाठी पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपात अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मिळावा असा पक्षाच्या माध्यमातून आग्रह असून त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचे घोडे अडले असल्याचे समोर येत आहे.

जर आपण 2019 या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर जिल्ह्यातील पारनेर तसेच अहमदनगर मतदारसंघांमध्ये शिवसेनेने उमेदवार दिले होते.यावेळी मात्र शिवसेना ठाकरे गटाने श्रीगोंदा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

ठाकरे गटाकडून साजन पाचपुते  श्रीगोंदा मतदारसंघातून आग्रही असल्याचे बोलले जात असून जर वेळेला नुकतेच अजित पवार गटातून बाहेर पडलेल्या अनुराधा नागवडे यांनी जर ठाकरे गटात प्रवेश केला तर मात्र त्यादेखील मशाल चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 श्रीगोंदासाठी शरद पवार गट देखील आग्रही

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटच नाही तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील दावा करत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल जगताप इच्छुक आहेत. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून घनश्याम शेलार देखील इच्छुक असल्याने काँग्रेसचा देखील या जागेवर दावा आहे.

परंतु या तीनही पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने श्रीगोंद्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. जर आम्हाला श्रीगोंदा मतदारसंघ मिळाला नाही तर पारनेरची जागा द्यावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

परंतु पारनेरची जागा जर ठाकरे गटाला गेली तर मात्र राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीला मात्र समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता आज किंवा उद्या मध्ये कळेल की श्रीगोंदा मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतो की राष्ट्रवादी शरद पवार गटाला?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe