Ahmednagar News : सध्या संपूर्ण राज्यात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आत असतानाच आता तर दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चक्क हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे.
आणि विशेष म्हणजे अहमदनगर येथे हा प्रकार उघड झाला आहे. जिल्हा रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तीन जणांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्हा रुग्णालयाने तपासणी केली नसतानाही तीन व्यक्तींना एप्रिल २०२४ मध्ये शासनाच्या ‘स्वावलंबन कार्ड’ या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत.
यातील एकही व्यक्ती सदरच्या तारखांना जिल्हा रुग्णालयात तपासणीला आल्याची नोंद नसल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाने तपासणी केल्याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र व त्या दिव्यांग व्यक्तीला त्याची ओळख दर्शविणारा ‘यूडीआयडी’ क्रमांक मिळू शकत नाही, असा नियम आहे. मात्र असे असताना देखील या तीन व्यक्तींना मात्र हा क्रमांक व प्रमाणपत्र कसे मिळाले.
या चारही व्यक्ती पाथर्डी तालुक्यातील आहे. अहमदनगरच्या सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केल्यामुळे ही बाब उघडकीस आली आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना याबाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले कि, आम्ही माहिती भरल्याशिवाय ऑनलाइन प्रमाणपत्र मिळू शकत नाही हे खरे आहे. परंतु आमच्या परस्पर शासनाचे संकेतस्थळ कुणीतरी हॅक करून हा घोटाळा केला असावा, असे म्हणाले.
दरम्यान अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून याहीपूर्वी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत लाभ मिळवण्याचे प्रकार समोर आले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रार देखील झाल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतल्याचे देखील यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणेच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
याबाबत सायबर पोलिसांना कळवले असून सायबर पोलिसांच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करता येईल असं जिल्हाशल्यचकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी म्हटले आहे.