Ahmednagar News : अहमदनगरच्या एका शेतकरी पुत्राला रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अर्थातच ब्लादिमीर पुतीन यांनी शाबासकी दिली आहे. जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील अंमळनेर येथील ऋषिकेश चंद्रकांत माकोणे यांच्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कौतुकाची थाप मारली आहे.
ऋषिकेश यांचे वडील चंद्रकांत माकोणे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. सध्या ऋषिकेश हा रशिया येथील कलिनिंग्राद शहरातील बाल्टिक फेडरल विद्यापीठात एमबीबीएसच्या शिक्षण घेत आहे.
2017 पासून तो रशियामध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान 25 जानेवारी 2024 ला अर्थातच गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा कलिनिंग्राद या शहरात दौरा होता. यावेळी पुतीन यांनी त्या ठिकाणी 40 रशियन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
25 जानेवारीला रशियात विद्यार्थी डे असतो. यामुळे विद्यार्थी डे च्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी कलिनिंग्राद शहरातील दौऱ्यादरम्यान चाळीस विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या विद्यार्थ्यांमध्ये अहमदनगरच्या ऋषिकेशचा देखील समावेश होता.
यावेळी या कार्यक्रमात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुतीन यांच्यासोबत संवाद साधला. मात्र, ऋषिकेशसोबत झालेला संवाद हा विशेष चर्चेचा ठरला. कारण की, ऋषिकेशने पुतीन यांना भारत-रशिया संबंध अधिक दृढ होतील का? हा प्रश्न विचारला असता पुतीन यांनी यावर तब्बल वीस मिनिटे उत्तर दिले.
यावेळी राष्ट्राध्यक्ष महोदय यांनी सोव्हिएत युनियनने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिलेला असून सध्या राज्यत्व, अर्थव्यवस्था, उद्योग निर्मितीत पाठिशी आहोत, असे महत्वाचे विधान केले.
तसेच भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर व राष्ट्राभिमुख नेतृत्व मिळाले असल्याचे यावेळी सांगत भारताचा जीडीपी वेगाने पुढे जात असल्याचे म्हटले आहे. यावेळी ऋषिकेशने भारतातील संस्कार आणि संस्कृतीबाबत पुतीन यांना अवगत केले आणि आपल्या भारताच्या विकासाचे बखान केले.
भारत-रशिया संबंध दोन्ही देशाकरीता कसा महत्वाचा ठरणार ? याबाबत ऋषिकेशने मांडलेले आपले मत, या संवादात त्यांच्याकडून देण्यात आलेली समर्पक उत्तरे हे सारे पाहून राष्ट्रपती पुतीनला भुरळ पडली. त्यांनी ऋषिकेशच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली.
अहमदनगरच्या शेतकरी पुत्राने एका वैश्विक नेत्यासोबत केलेला हा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ऋषिकेश यांच्यावर चहुबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रसार माध्यमांमध्ये ऋषिकेश आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यातल्या संवादाची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.